Wednesday, December 12, 2007

सुरवंटी मन अजून चरते...

सुरवंटी मन अजून चरते
आयुष्याच्या जुनाट पानीं -
थोड्या हिरव्या, बऱ्याच पिवळ्या.
सांगत बसते कानोकानीं
गोष्टी रंजक फुलपंखांच्या -
लांबलचक पण साऱ्या खोट्या!

मन लंगडते पुन्हा फुलवुनी
फुशारकीचा मोरपिसारा -
थोडा रंगित , बराच विटका.
दाबत कंठी घुसमटणारा
रितेपणाचा दिगंत टाहो -
अस्तित्वाचा जिवंत चटका!

अंधारातिल रातकिडा मन
आधाराला गाई गाणे -
थोडे उत्कट, बरेच भेकड.
स्वतःचसाठी हे किरकिरणे
उघडझापही केविलवाणी -
प्रकाशण्याची वेडी धडपड!

Wednesday, August 15, 2007

अखंडा- (दी अनब्रोकन )

कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।
करावया गेला। भाषांतर॥

अभंग तुक्याचे । करी विंग्रजीत।
दूध पीतपीत । वाघिणीचे ॥

तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥

इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥

झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज

Saturday, July 21, 2007

वारी

सय विठोबाची आली
माया माहेरी चालली
दिंडी आषाढात जाई
सृष्टी पालखीस भोई

झाला कीर्तनात दंग
ढग वाजवी मृदंग
ठेका भजनाचा धरी
येती पावसाच्या सरी

गेला देहभाव सारा
नाचे रिंगणात वारा
विठूनामाचा गजर
गात वाहती निर्झर

खांदी पताका भगवी
सूर्य दिशांना जागवी
भक्तीरसात न्हाऊन
मग पालवते ऊन

नभी उधळे अबीर
मन मायेचे अधीर
दिंडी चाले भराभरा
झाली घाई चराचरा

दिंडी पंढरी गाठते
माया ब्रह्मास भेटते
होते पंढरीची वारी
भेटे द्वैत उराउरी

भिंतीवरची रांग : मुंग्यांची

यंत्रवत भावना : 'म'कार,'न'कार
अनुभवग्रस्त शब्द : टुकार, भिकार
ओळी ; मुंगीचे पाय : एकेक अक्षर
जोडून-खोडून : कविता(?) : वरवर !

शब्दशून्य, अक्षर, बेबंद जाणीव
विश्व! : आयुष्य? : कीटक जीव
बाकी वजा ; फक्त अधिक कीव
कडवट जीभ : चरबट रीवरीव !

Monday, July 9, 2007

कळप हुंदडे पुष्ट ढगांचा

कळप हुंदडे पुष्ट ढगांचा
मत्त हत्तीसम पिऊन वारा
वेदघोष पर्जन्यऋचांचा
करत चालल्या या जलधारा

नभमंची कल्लोळ माजवी
वीज नाचते सोडून लाज
धुंद होऊनी वरूण वाजवी
अनाहताचा जणु पखवाज

कुंद हवेची काळी चादर
पांघरते जेव्हा धरती
थेंब टपोरे पिऊन डोंगर
स्वप्न मनी हिरवे बघती

आनंदाची अवखळ गाणी
कोठे गाती शुभ्र प्रपात
कोठे प्राशीत लाल वारुणी
नदी भटकते झिंगून जात

***
उभी साठवत मनी चिंबपण
वेडी भिजते नाजुक वेली
हवीहवीशी जणू आठवण
कळी उमलते हळूच ओली...

हवीहवीशी जणू आठवण
कळी उमलते हळूच ओली...

Tuesday, June 5, 2007

खंत

प्रत्येक चेहरा आता विंगेत रंगतो आहे
प्रत्येक नर्मदी गोटा गंधात माखतो आहे

"मी बोलणार ना खोटे" ही शपथ वाहतो आहे
सोयिस्कर मज वाटे जो - तो अर्थ काढतो आहे

गुंडाळला रिळाला जो कोराच पाहिला होता -
-तो आज बातम्या खोट्या रंगीत दावतो आहे

चंद्रास भाकरीच्या ना मोताद राहिला कोणी
प्रत्येक पाव खाणारा मग केक मागतो आहे

लावली मीच माझ्याशी - ती पैज जिंकण्यासाठी
लावून झापडे दोन्ही बुंगाट धावतो आहे

लागीर वाटते झाले मानव्य ईश्वरालाही
देवत्व मिरवण्यासाठी सत्संग भरवतो आहे

'चोरून भोग देण्याला उरलीच वेदना नाही'
ही खंत लपवण्यासाठी आक्रोश माजतो आहे

लावाच रंग अर्थाचा भिंतींस जीवनामधल्या
तत्वज्ञ तुंबला कोणी घ्या पिंक टाकतो आहे

Friday, June 1, 2007

नदीकाठची कातरवेळ

डोळे गुंगती रिकाम्या अंतराळात गहन
नभ - अबोल, विषण्ण - होते झाकोळले मन

सोनसावळ्या नदीत कांही डुंबतात नावा
हंबरती गुरे-गायी, वाजे कारुण्याचा पावा

वार्‍यावर लवलवे स्तब्ध पापणीचे पाते
एकतारीवर कोणी विरहिणी गात जाते

डोळ्यातल्या पाण्यामध्ये चिंब पाखरांचे थवे
सूर्यपक्षी बांधू पाहे एक घरकूल नवे

घाटावरी मंदिरात घणघणे घंटानाद
घुमटीत हृदयाच्या घुमणारा पडसाद

लाटांवर पसरती आर्त आरतीचे सूर
थांबे तसा निघायाचा दग्ध चितेतून धूर

वाहतात अंधारात क्षीण दीपकांच्या ओळी
स्वप्ने आणि आठवांची वर्तमानात रांगोळी

Saturday, May 26, 2007

रात्र

रात्र अंधाराचा भोग
रात्र चांदण्याचा रोग
घेत राधिकेचे सोंग
रात्र सांगे कामयोग

रात्र संयमाला फाशी
रात्र पाशवाची राशी
घेते कानोसा दाराशी
रात्र जारिणी जराशी

रात्र मायावी शेवाळ
रात्र नर्तकी कुचाळ
बांधे वासनांचे चाळ
रात्र नाचते नाठाळ

रात्र कवेत माईना
रात्र झोपीही जाईना
तिचा शृंगार होईना
रात्र मागते आईना

आता उजाडेल दिस
रात्र होई कासवीस
देई मदन रतीस
उन्मनाचे मोरपीस

Thursday, May 24, 2007

पीळ

बुरुजातल्या कथांना चिणला सबूत आहे
प्राचीन या गढीचे विकराल भूत आहे

फाशांमधे जगावे, फाशांवरी मरावे
हा कैफ़ जीवनाचा- फसवाच द्यूत आहे

पैशास जो कधीही विकलाच जात नाही
तो कोण या जगी रे, मायेस पूत आहे?

पिंजू तरी किती हे - हृदयास पीळ नाही
नाकास भावनेच्या, धरलेच सूत आहे

धिंडी जिथे निघाल्या सार्‍याच नागव्याने
या अब्रुदार चिंध्या मी व्यर्थ धूत आहे!

...तुझी आठवण!

तेंव्हा...
दिडदा सतार
बाळाचं जावळ
रविवर्म्याचं चित्र
खडीसाखर
अत्तराचा फाया

आता...
ओरखडे काचेवर
तापलेला तवा
गटारातलं डुक्कर
पाटणकर काढा
धोतऱ्याचं फूल

...तुझी आठवण!

काही खरे नाही...

सारे शपथेवरच खरे बोलतात - हे काही बरे नाही
जपून विश्वास ठेव जरा - शपथेचे काही खरे नाही....

क्षणोक्षणी होतात येथे हल्ली - हल्ले घड्याळांचे
आहे तोच तुझ मान - क्षणाचे काही खरे नाही...

मनाला चिकटलेत दुकानी शब्द - "कणकण में है भगवान"
त्यानेच केलीय साठेबाजी - कणाचे काही खरे नाही...

कोण म्हणते - "शब्दांची शस्त्रे - शब्दांची रत्ने"?
वाळवी खाते शिळी रद्दी - शब्दाचे काही खरे नाही...

बोटे जातात तोंडात हमखास - हिरव्या नोटा मोजताना
स्वतःलाच हसत असावा तो- महात्म्याचे काही खरे नाही...

झेंडा

खिन्न तांबड्या क्षितिजावरती मूक काळिमा पसरत जातो
आठवणींच्या दोराला मग रिता पोहरा लटकत जातो

छातीमधल्या तंबोर्‍याच्या सार्‍या तारा सुटून जाती
अहिरभैरवी निरोप देउन दूत सुरांचा भटकत जातो

पोट रिकामे ढगांचेच जर - आभाळा रे, खा 'ती' माती -
धरतीवर ज्या कोळपलेला कोंभ कोवळा टपकत जातो

नाही तारा, नसे हिराही - आगळ्याच त्या अंतर्ज्योती
अशनी माझा जिवंत झाला - पहा लयाला चमकत जातो

उकंड्यातल्या फडक्याला त्या मिंध्या चिंध्या ठिगळत जाती
- कुणा कळावे कशाकशाचा येथे झेंडा फडकत जातो?

जरासा...

ताठला होता जरासा...
मोडतो रस्ता जरासा...

ओळखे तेंव्हा मला मी
विसरलो आता जरासा...

चिघळती भेगा मनाच्या
वाफसा येता जरासा...

थांबते चर्चा अशी का?
मी तिथे जाता जरासा...

पिंजराही मित्र होतो?
बोलतो तोता जरासा...

तोच आहे तीरकमठा
हा नवा भाता जरासा...

लोकशाही धन्य झाली
लाजतो नेता जरासा...

अजून...

अजून गाती तुझीच गाणी दग्ध परांचे पक्षी
अजून उठते स्मृतीपटलावर तुझीच सुंदर नक्षी

अजून आतील पार्‍यावरती तुझ्याच प्रतिमालाटा
अजून डोळे शोधत बसती तुझ्याच पाऊलवाटा

अजून वेड्या वार्‍यावरती तुझाच दरवळ येतो
अजून मनाच्या दारावरती तुझाच पदरव होतो

अजून लावतो पुन्हा उगाचच अर्थ तुझ्या शब्दांचा
अजून घेतो कधी कधी मी शोध तुझ्या गावाचा

Wednesday, May 16, 2007

इतिहास

काळ्पुरुषाच्या अभंग पिंडीसमोर बसलाय तो .. दगडी नंदी!

कधी त्याच्याही नाक्पुड्यातून पसरल्ए असतील आगीचे लोळ...
त्याच्याही डोळ्यात पाझरले असेल रक्त...
आता नाहीत ते फुत्कारणारे निश्वास!
आता मत्र त्याचे डोळे अबोध, निर्व्याज, अर्थ्शून्य!

त्याला डावी किंवा उजवी प्र्दक्षिणा घाल्तात लोक
आपलीच दिशा ब्रोबर मानणारे धडकतात
आणि त्यांची डोकीही फुटतात.
पण नंदी कोण्तीच साक्ष देत नाही.
तो नुसता बसून राह्तो अबोध, निर्व्याज, अर्थ्शून्य!

Tuesday, May 15, 2007

गारगोट्या

मैफिलीला दीनसे संगीत नाही
घोट कोणी आसवांचे पीत नाही

ऊर्ध्वगामी भोवर्‍याला नाळ नाही
आणि त्याचे दु:खही बेंबीत नाही

उघडली सारी दुकाने ही सुखाची
पण उधारी ठेवण्याची रीत नाही

स्वप्न नाही - बुब्बुळांच्या गारगोट्या
घोरतो मी - झोपणे माहीत नाही

चंदनाचे खोड आता जून झाले
गंध त्याचा अंग हे जाळीत नाही

या भिकारी कागदांना काय देऊ?
एकही कविता कशी शाईत नाही?...

मदारी

तू मदारी - खेळवीशी लीलया हे शब्द सारे
बघ कुणाचा जीव जातो, हा विखारी खेळ का रे?

चढवणे मी बंद केले - साहसी माझ्या शिडांना
वाहणे थांबून गेले आठवांचे भण्ण वारे

मोडले घरटेच त्याचे, पंखही उसवून जाती
भरवताना भावनांच्या चोचल्यांना चिमणचारे

ऐकतो की लांघले तू पावलांनी विश्व सारे
घे तुला आकाश माझे, घे तुला हे सूर्यतारे

येथ जो तो देव झाला, बांधतो अपुलीच पूजा
ईश आता मुक्त झाला, राउळाची बंद दारे

छेद

उध्वस्त त्या महाली तो एकटाच गेला-
त्याचाच खांब झाला आतून भंगलेला

मजला सवाल पडला - दोहा कसा लिहावा?
आतील रे कबीरा तू वीण एक शेला

वाळूत चातकाला का चांदणे दिसावे?
की धूर्त मृगजळाने चोरून चांद नेला?

ऐन्यास वेड लागे पाहून त्या परीला
पार्‍यास पंख आले, काचेस छेद गेला

पाहून वेष माझा थुंके जरी भिकारी
मी दावताच नोटा राजा झुकून गेला

ऐकून बातम्या 'त्या' खात्री कशी पटेना?
आताच ते म्हणाले,"मेला, समाज मेला!"

"लाटांत माणसांच्या माणूसकी बुडाली!",
"जलधीत एक मासा फिरतो तहानलेला!"

भींत

मी ध्रुव जो ढकलला मांडीवरून जातो
प्रत्येक मार्ग माझा वेदीवरून जातो

लपवून ठेवतो मी ते बोल अंतरीचे
(तांडा किती कवींचा वेशीवरून जातो)

शिंपीत राहतो मी निर्माल्य वाळलेले
तो ढीग पाकळ्यांच्या ओलीवरून जातो

नाहीच छापलेला पोथीत पंडितांच्या
प्रत्येक शेर त्यांच्या डोईवरून जातो

वाघावरून येती मज भेटण्यास त्यांना
आलिंगण्यास मीही भिंतीवरून जातो

मारून त्याच बाता येईल की सफाई
(अस्वस्थ हात अजुनी टोपीवरून जातो)

दांडी (हझल)

हुंदका साधा तुझा सांगून गेला
बॉल तो या बॅटच्या लांबून गेला

कोण होता तो बुकी कळलेच नाही
बॉबचा जो बघ गळा दाबून गेला

पकडला, पुन्हा सटकला,बुळबुळा
आणि मोरीच्या तळीं साबून गेला

योजली मी आजही शाळेस दांडी
बाप माझा पण इथे डांबून गेला

आज का ती बस इथे आलीच नाही?
तास झाला पण विसु थांबून गेला

रिंगण

हुंदका साधा तुझा सांगून गेला
मख्मली हुंकार ते - तुडवून गेला

मज कशाला सांगता त्या कृष्णलीला?
अंगणी मम काल तो रांगून गेला

भागल्या क्षितिजा अता बघ झोप आली
खगथवा बघ दूर तो पांगून गेला

जात होता तो कुठे? - कळलेच नाही
दशदिशांच्या रिंगणी रंगून गेला

रात्रीलाही नीज येई - बाहुपाशी
चांद - केशीं माळला - पेंगून गेला

जागजागी मद्यशाला या कशाला?
मत्त जो तो अंतरी -झिंगून गेला

बुरखा

कशास थोडे मोजुन मापुन
खुशाल द्यावे स्वतःस झोकुन

मनोवनातिल हिरवळ सारी
पातेपाते जावी पेटुन

प्रभा नसावी तमास या अन
प्रकाश जावा अंधःकारुन

नको किनारा जीवनास या
वहात जावे समिंदरातुन

लहालहा या शुष्क जिभेतुन
सारी थुंकी जावी आटुन

अशांत आतिल उधाणास त्या
निवांत जागी द्यावे ओकुन

कणाकणाने केले गोळा
पशापशाने द्यावे उधळुन

मेंदुवरचे कलप उडावे
धोप फुटावे विचार त्यातुन

पांढरपेशी बुरखा द्यावा
अधि टरकावुन मग भिरकावुन

ताकीद

येथेच सप्तरंगी पिशव्यांत रक्त मिळते
तुकड्यांत वाटलेले आकाश फक्त मिळते

खांद्यावरी स्वत:च्या पेलेल स्वर्ग- त्याला
नरकात राहण्याची ताकीद सक्त मिळते

पंखांत वीज त्यांच्या, बेफाम अन भरारी
पण त्या गरुडपिलांना, घरटे विभक्त मिळते

सारेच राम त्यांनी, बेडीत बंद केले
आता न रावणांना, आव्हान शक्त मिळते

घाणीत पाय का तो ठेवीत येत नाही
नक्कीच ईश्वराला, कित्येक भक्त मिळते

कैद

उरली अता हिशेबी, कोरी विदीर्ण पाने
अन आज काळ भरतो, सारे रिते रकाने

उरले कुणीच नाही, ते आज ओळखीचे
लांबून हात केला, माझ्याच आठवाने

झाली पहाट पुन्हा, मैफ़ल थकून गेली
स्वर्गात मंद झाली, सारीच शामदाने

बसलास कोणत्या तू, जाऊन दूरदेशी?
धुंडाळले अता मी, सारे तुझे ठिकाने

मी कोणतीच त्याला, जरि याचना न केली
अर्धीच संपवावी, ही कैद का तयाने?

हरिणी मुकी बिचारी, कुरणी विसावलेली
हा घातलाच घाला, त्या क्रूर श्वापदाने

गिद्ध

जळून राख वात पण - प्रकाश शुद्ध भासतो
पिऊन रक्त, आजचा - खुशाल बुद्ध हासतो

नृमुंड आसनावरी नरेंद्र डोलतो जसा -
अनेक डंख मारुनी भुजंग - सिद्ध भासतो

अखंड काळरात्र ही - प्रभा कशी म्हणू तिला?
दिवाकरास त्या पुन्हा, प्रचंड गिद्ध ग्रासतो

'अजूनही कुणी कसे, उठाव ना करे इथे? '-
कधीकधी मनातला विचार क्रुद्ध - त्रासतो

जिताच मी मरून - का शरीरबद्ध राहतो?
असूनही तरूण मी - मलाच वृद्ध भासतो

अर्घ्य

ऋतू येत होते, ऋतू जात होते
मुकी भैरवी झाड का गात होते?

प्रकाशा मिळावा कसा तो निवारा?
चक्षूच घनघोर तिमिरात होते

अता सोडवावी कुणी रामकांता?
जटायूच सारे विचारात होते

प्रभाती अरुणास का अर्घ्य द्यावे?
तुझे मूर्त लावण्य -सुस्नात- होते

तुटावे - अंतरीचे सारेच बंध
असे काय त्या तव शब्दांत होते?

अकाली फुटावी मना पालवी
तसे ओठ माझेच का गात होते?
 
Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License