Monday, July 13, 2020

तुला भेटण्याआधी...


असा कधी गुदमरलो नव्हतो तुला भेटण्याआधी
मुळात मी डळमळलो नव्हतो तुला भेटण्याआधी

काय करावे कसे करावे सारे ठरवत होतो
तसेच होईल वाटत होते तुला भेटण्याआधी

रमतागमता जीवन जगलो उधळत क्षणाक्षणाला
स्वप्नांमध्ये रंगत होती तुला भेटण्याआधी

मोजमाप मी नव्हते केले माझ्या अस्तित्वाचे
पारड्यात मी पडलो नव्हतो तुला भेटण्याआधी

घनतम सरले दिशा उजळल्या दृष्टी आली नेत्रीं
खरे काय ते दिसले नव्हते तुला भेटण्याआधी

भेटलास तू स्वच्छ हवेतच बरेच झाले देवा
गाभाऱ्याची भितीच होती तुला भेटण्याआधी



Monday, January 28, 2013

सिद्धोबा

मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर दुपारी अचानक
एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो.
मूळ खोड नसणाऱ्या
पारंब्यांच्या वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी
एक नितळ झरा आहे, थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही-

निळंशार आकाश, स्वच्छ मन,
निवलेले डोळे, अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!

पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.
.

Saturday, June 4, 2011

वळवळ केवळ

कोण ऐकतो, कोण समजतो? फुकाच अवघी तळमळ केवळ
झोप रात्रिची उडून जाते, होते पोटी जळजळ केवळ

मनास वाटे व्हावी क्रांती, राहु नये ही चळवळ केवळ
टीव्ही आणिक फेसबुकावर हाय उठवते खळबळ केवळ


रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ


सामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ
गळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ


ऊंचऊंच लाव्हा उसळावा स्वस्थ पसरला फुटून कातळ
आत्मतुष्टिचा झरा वाहतो थंडपणाने खळखळ केवळ


टरारणार्‍या स्नायुंमधुनी बसेल हिसका तुटेल साखळ
सांड बडवले जुवे खेचती, थुंकी गळते घळघळ केवळ


'जन्मलोच तर जगून जाऊ' - कापुरुषांची धडपड निर्बळ
गटारातल्या गांडवळांची अशीच असते वळवळ केवळ

***

Thursday, August 12, 2010

कणसूर

का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे?
कोण अज्ञातातुनी* निर्यातले काहूर आहे?

लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की !
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?

दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे?
बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे

गीत जे तो गात आहे बेसुरे आहे खरे ते
(शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे)

पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे

---------------------------------------------

*'ज्ञ' हे अक्षर जोडाक्षर म्हणून घेतले आहे.
चु.भू.द्या.घ्या.

Saturday, November 1, 2008

माझी कविता

कविता माझी आहे अल्लड
गाल गोबरे डोळे मोठे
कधी हरकते कधी हरपते
कधी रागवे खोटेखोटे

ओठांची कधि चुंबळ करूनि
अश्रापाचा देते पापा
बोल बोबडे तिचे मारती
विश्वदर्शनी विशाल गप्पा


नाचनाचुनी कधी सांगते
आनंदाचा पाय थकेना
कधी उशाशी तिच्या सांडते
उसासणारी उष्ण वेदना


उगाच बसते कधी मुक्याने
दूर लाऊनि शून्यदिठी
जरा खुलवता मला घालते
मऊ ढगासम सांद्र मिठी

माझी मुलगी कविता माझी
वणव्यामधला प्राणविसावा
अव्यक्ताची खूण गोमटी
उध्वस्तातिल अभंग ठेवा

Monday, April 21, 2008

घोडा आणि ओझे

दूर कुठेशी धूळ उडवतो घोडा माळावरती
टापांखाली स्वप्न उद्याचे, नाकपुड्या फुरफुरती

नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती
नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती

सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती
देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती

करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती
मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती '

आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ?
- मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती

ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती
कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती
***

***
जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती
आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती

आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती
आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

वाद घालतो "नव्हेच तुमची, ही तर आमची माती
वेगवेगळी आता लिहावी तुमची आमची खाती"

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यांवरती...

Wednesday, December 12, 2007

सुरवंटी मन अजून चरते...

सुरवंटी मन अजून चरते
आयुष्याच्या जुनाट पानीं -
थोड्या हिरव्या, बऱ्याच पिवळ्या.
सांगत बसते कानोकानीं
गोष्टी रंजक फुलपंखांच्या -
लांबलचक पण साऱ्या खोट्या!

मन लंगडते पुन्हा फुलवुनी
फुशारकीचा मोरपिसारा -
थोडा रंगित , बराच विटका.
दाबत कंठी घुसमटणारा
रितेपणाचा दिगंत टाहो -
अस्तित्वाचा जिवंत चटका!

अंधारातिल रातकिडा मन
आधाराला गाई गाणे -
थोडे उत्कट, बरेच भेकड.
स्वतःचसाठी हे किरकिरणे
उघडझापही केविलवाणी -
प्रकाशण्याची वेडी धडपड!

Wednesday, August 15, 2007

अखंडा- (दी अनब्रोकन )

कोणे एके वेळा। विसु झाला खुळा।
करावया गेला। भाषांतर॥

अभंग तुक्याचे । करी विंग्रजीत।
दूध पीतपीत । वाघिणीचे ॥

तुका म्हणे आता। रहावे उगीच।
पहावी बरीच । मजा त्याची॥

इवल्या मुंगीची । होते आता ऍन्ट
झाली अंडरपॅन्ट । लंगोटीची ॥

झाला हा नाठाळ। कोण विदुषक?।
"ब्रिंग मी अ स्टिक"। तुका सेज

Saturday, July 21, 2007

वारी

सय विठोबाची आली
माया माहेरी चालली
दिंडी आषाढात जाई
सृष्टी पालखीस भोई

झाला कीर्तनात दंग
ढग वाजवी मृदंग
ठेका भजनाचा धरी
येती पावसाच्या सरी

गेला देहभाव सारा
नाचे रिंगणात वारा
विठूनामाचा गजर
गात वाहती निर्झर

खांदी पताका भगवी
सूर्य दिशांना जागवी
भक्तीरसात न्हाऊन
मग पालवते ऊन

नभी उधळे अबीर
मन मायेचे अधीर
दिंडी चाले भराभरा
झाली घाई चराचरा

दिंडी पंढरी गाठते
माया ब्रह्मास भेटते
होते पंढरीची वारी
भेटे द्वैत उराउरी

भिंतीवरची रांग : मुंग्यांची

यंत्रवत भावना : 'म'कार,'न'कार
अनुभवग्रस्त शब्द : टुकार, भिकार
ओळी ; मुंगीचे पाय : एकेक अक्षर
जोडून-खोडून : कविता(?) : वरवर !

शब्दशून्य, अक्षर, बेबंद जाणीव
विश्व! : आयुष्य? : कीटक जीव
बाकी वजा ; फक्त अधिक कीव
कडवट जीभ : चरबट रीवरीव !
 
Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License